सिन्नर: सासुरवाडीला जाऊन सासू-सासऱ्याशी वाद घालत एकाने स्वतःला ज्वलनशील पदार्थाने पेटवून घेत, पत्नी व सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात घडली. या प्रयत्नात ६५ टक्के भाजलेल्या, केदारनाथ दशरथ हांडोरे (२९, रा. शिंदेवाडी, ता. सिन्नर) याचा सोमवारी दुपारी २ वाजता जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी केदारनाथ हांडोरे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच-सहा महिन्यांपूर्वीच केदारनाथ हांडोरे आणि स्नेहल यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादातून काही दिवसांपासून स्नेहल सोनारी (ता. सिन्नर) येथे माहेरी राहत होती. याच रागातून केदारनाथने आपले साथीदार हरीश डुंबरे, कृष्णा थोरात, गणेश थोरात, विशाल तुपसुंदर यांच्यासह रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास स्नेहलच्या माहेरी पोहोचला. तेथे स्नेहल आणि केदार यांच्यात वाद झाले.
केदारनाथ व त्याच्या साथीदारांनी संगनमताने स्नेहल व तिची आई यांच्याशी झटापट केली. केदारनाथने स्नेहलचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखवत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःला पेटवून घेऊन पत्नी स्नेहल व तिच्या आईला जिवे मारण्याच्या उद्देशाने मिठी मारली. यात स्नेहल ५५ टक्के, तर सासू अनिता शिंदे ६५ टक्के भाजल्या आहेत. या घटनेत गंभीररीत्या भाजल्याने केदारनाथला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्नेहल हांडोरे आणि अनिता शिंदे यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी स्नेहल (१९, रा. शिंदेवाडी, हल्ली मु. सोनारी, ता. सिन्नर) यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वाघमारे तपास करत आहेत.