जळगाव: जळगाव शहरातुन एक बातमी समोर आली आहे. येथील कालिका माता मंदिराजवळ एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्रीच्या 11 वाजण्याच्या सुमारास मारेकऱ्यांनी तीक्ष्ण शस्त्राने तरुणाला भोसकल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. आकाश पंडित भावसार (वय 30 वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पत्नीचे मावस भावासोबत अनैतिक संबंध…
मयत आकाशची पत्नी पूजा हिचे तिच्या सख्या मावस भावासोबत अनैतिक संबंध होते, असा गंभीर आरोप आकाशच्या आई, बहिण व मेव्हणे यांनी केला आहे.
आकाशची हत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच आकाश बाबत माहिती त्याच्या पत्नी पूजानेच मारेकऱ्यांना दिली आहे. असा आरोपही आकाशच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.