जळगाव : जळगाव शहरासह परिसरात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. तासाभराच्या पावसाने संपूर्ण परिसरात धुमाकूळ घातला. या दरम्यान जळगाव तालुका परिसरात दोन ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एका घटनेत शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरसोली गावाच्या शिवारात घडली.
शेतात अडोश्याला उभे आणि..
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोलीच्या नायगाव शिवारातील आपल्या शेतात त्र्यंबक ओंकार अस्वार (वय ६८) हे शेतात काम करीत होते. या दरम्यान दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला. यामुळे शेतात अडोश्याला उभे असताना अस्वार यांच्या अंगावर वीज कोसळली. यात अस्वार हे जवळपास २० फुटांपर्यंत फेकले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
त्र्यंबक आस्वार यांच्या अंगावर वीज कोसळल्याचे शेतातील एका मेंढपाळाने बघितले असता तो मदतीसाठी धावून गेला. मेंढपाळाच्या आरोळ्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मदतीला धाव घेतली. तत्काळ बैलगाडीतून अस्वार यांना शासकीय रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
द्वारका नगर परिसरात देखील पडली वीज…
याच वेळी जळगाव शहरातील द्वारका नगर परिसरात देखील वीज पडल्याची घटना घडली आहे. द्वारकानगरातील एका घरावर वीज पडली. यामध्ये घराच्या भिंतीचा भाग कोसळला आहे. तसेच घराजवळील लिंबाचे झाडाचा पाने देखील यात जळाली आहेत.