नाशिक : शिवसेना ठाकरे गटातर्फे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. २६) मुंबईत मातोश्री येथे लोकसभा मतदारसंघातील सिन्नर, देवळाली, इगतपुरी, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य या पाच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. कोणत्या मतदारसंघात कोणाचे प्राबल्य आहे, याविषयी त्यांनी माहिती घेतली.
यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने भरघोस मतदान केले. विधानसभा निवडणुकीसाठीही शिवसेना ठाकरे गट, तसेच महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून, सर्वत्र आपलेच प्राबल्य राहील, असे बडगुजर आणि शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. निवडणूका केव्हाही लागली तरी त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्व उपजिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख, तालुकाप्रमुख आदी पदाधिकारीही उपस्थित होते.