नाशिक : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला, राज्यांना कर्ज देणे, दळणवळण सुधारणे अशा अनेक गोष्टींवर अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आले आहे. बजेटवर टीका करण्यासारखे काहीही नाही. कॉर्पोरेट टॅक्सवर सवलत देण्यात आलेली आहे. अनेक नवीन विमानेही येतील. लहान-लहान शहरात मेट्रो आणण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे, असे ते म्हणाले.
अंतरिम जरी असला तरी सर्वसमावेशक अर्थसंकल्प
ते पुढे म्हणाले की, मत्स्य व्यवसाय वाढण्यासाठी फार मोठे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे. राज्यांना बिनव्याजी कर्ज, मोफत धान्य देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चशिक्षण संस्था तयार करणार, पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग, मोफत वीज, 15 एम्स रुग्णालय हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. सर्व घटकांमध्ये योजना आखण्याचे ठरण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी सर्वसमावेशक असा आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.