सटाणा : लखमापूर येथील तरुणाशी विवाहबद्ध झाल्यानंतर सासरच्या संपूर्ण कुटुंबीयांना गुंगीचे औषध देऊन पलायन करणाऱ्या नववधूस तिच्या मामा व मावशीसह पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील तरुणाशी विवाहबद्ध झालेल्या नववधूने सासरच्या संपूर्ण कुटुंबीयांना गुंगीचे औषध देऊन तिच्या मामासोबत पलायन केले होते. याप्रकरणी तपास सुरू असतानाच घटनेच्या बाराव्या दिवशी संशयित घोटी येथे नव्याने सोयरीक जुळविण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून संशयित नववधू, तिचे मामा व मावशीला ताब्यात घेतले. या तिघांना घोटी पोलिसांनी सटाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
लखमापूर येथील वसंत माणिक पाचोरे यांच्याशी विवाह झालेली नववधू लीना मंदाळे हिने पाचोरे कुटुंबीयांना २९ मार्चच्या रात्री जेवणामध्ये झोपेचे औषध देऊन पलायन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सटाणा पोलिसांनी संबंधित एजंटला विश्वासात घेत तपास सुरू केला. नाशिक येथील राजू जैन नामक एजंटने संशयित लीना मंदाळे व तिच्या सहकाऱ्यांना, तुमच्यासाठी घोटीचे स्थळ शोधले आहे, असे सांगितले. त्यानंतर जैन याने एका घरात जाऊन व्हिडिओ कॉल करून हेच नवीन सोयरिकीचे घर आहे, असे पटवून दिले. या सोयरिकीतून एक लाख ६० हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवल्यामुळे संशयितांनी तत्काळ होकार देत घोटीला येण्याची तयारी दर्शविली.
त्यानुसार पोलिसांनी घोटीतील संबंधित ठिकाणी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लीना मंदाळे, तिचा मामा आनंदा परसराम दळवी व मावशी काशीबाई वाघमारे नामक महिला हे सर्व गुरुवारी (दि. १०) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घोटी येथे पोहोचले असता, पोलिसांच्या सापळ्यात अडकले. घोटी व सटाणा पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत तिन्ही संशयितांना अटक केली असून, रात्री उशिरा त्यांचे सटाणा पोलिस ठाण्यास प्रत्यार्पण करण्यात आले.विवाह संस्काराच्या बाबतीत अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध समाजघटकांकडून होत आहे.
अशी केली कमाई
लखमापूर येथील विवाहाचा प्रमुख एजंट नाशिक येथील साहेबराव शिंदे व त्याची नातेवाईक महिला यांनी या विवाहापोटी एक लाख दहा हजार रुपये घेतले होते, तर दुसरा एजंट राजू जैन याने ११ हजार रुपये घेतले होते. उर्वरित एक लाख ३० हजार रुपये लीना मंदाळे हिने घेतले होते. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी पाचोरे कुटुंबाची फसवणूक केल्यानंतर लगेच दुसरे सावज शोधण्याच्या तयारीत ही टोळी होती.
नववधू छत्रपती संभाजीनगरची
संशयित नववधूसह तिच्या मामा व मावशी यांच्याकडून मध्यस्थामार्फत लखमापूर येथील विवाहातील कुटुंबीयांना खोटी माहिती पुरविण्यात आली होती. संशयित पोलिसांच्या हाती लागल्यानंतर यातील नववधू छत्रपती संभाजीनगरजवळील रांजणगाव एमआयडीसीत राहत असल्याची माहिती समोर आली.