-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : ब्रम्हपुरीचे काँग्रेस उमेदवार तथा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळली आहे. सदर याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्तीद्वय देवेंद्रकुमार उपाध्याय व नितीन डब्ल्यू. सांबरे यांनी फेटाळली.
सदरची याचिका भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 अंतर्गत परिवर्तन महाशक्ती या तिस-या आघाडी मधील स्वाभीमानी पक्षाचे उमेदवार ॲड. नारायण दिंबाजी जांभूळे यांनी काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवार विरुद्ध दाखल केली होती. सदर प्रकरणात शासनाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. एन. एस. राव यांनी सरकारची बाजू मांडली.
याचिका कर्ता ॲड. नारायण दिंबाजी जांभूळे यांनी गैरअर्जदार मुख्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी 73 ब्रम्हपुरी, काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर व कंट्रोलींग रेव्हेन्यू ॲथॉरिटी यांच्या निवडणूक विरुद्ध याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सदर याचिकेवर निर्णय देताना, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नसल्याचे सांगून सदर याचिकेची दखल घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला व सदर याचिका फेटाळली. तथापि, सदर याचिका गुरुवारी निकाली काढण्यात आली. उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्याकडून वरिष्ठ वकील ॲड. निरज चौबे यांनी उच्च न्यायालयात काम केले.