अहमदनगर : महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी वडीलांनी पैसे न दिल्याच्या रागातून शिक्षकाच्या मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. गजानन रामदास उगले (वय-२३ रा. नायगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना जामखेड तालुक्यातील नायगाव येथे घडली. गजानन याच्यावर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल २३ दिवसांनी उपचारादरम्यान गजानन याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत गजानन याचे वडील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गजानन याने वडीलांनकडे महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, ते पैसे न दिल्याच्या रागातून गजाननने मागिल महीन्यात २८ एप्रिल २०२४ म्हणजे २३ दिवसांपुर्वी विषारी औषध प्राशन केले होते. यानंतर त्याला जामखेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू होते.
गजानन याच्या प्रकृतीतमध्ये हळुहळु सुधारणा होत होती. तसेच त्याला दोन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात देखील येणार होते. मात्र, १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटना खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आसल्याने सदरची नोंद खर्डा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.