नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणीने इमारतीवरून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमधील इंदिरानगर भागातील साईनाथनगर चौफुलीवर ही घटना घडली आहे. अनम गुलमोहम्मद खाटीक (वय 22) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. या भागात असलेल्या प्रतिभा संकुलाच्या बिल्डिंगमध्ये ही अनम खाटीक राहत होती. आज दुपारच्या २ वाजेच्या सुमारास तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अमन ही नाशिक फार्मसिसच्या शेवटच्या वर्गामध्ये शिकत होती.
या घटनेची माहिती मिळताच इंदिरा नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांना तिच्या रुममध्ये कॉलेजचे ओळखपत्र सापडलं. त्यावरून तिची ओळख पटली आहे. अनम ही सध्या जे.एम.सी.टी फार्मसी महाविद्यालायमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. अनम ही सकाळी १० वाजता कुणाला तरी भेटण्यासाठी आली होती. मात्र, त्यानंतर दुपारी तिने २ वाजेच्या सुमारा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन तिने उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.