नाशिक : नाशिक जिल्ह्यातुन एक धकाकड्याक बातमी समोर येत असून दिंडोरीच्या वनारेवाडी परिसरात रात्री युवकावर बिबट्याचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये विठ्ठल पोद्दार या १६ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध सुरू आहे.
नाशिकमध्ये बिबट्याचा पुन्हा मुक्त संचार असल्याचं काल २२ ऑगस्ट रोजी उघड झालं आहे. नाशिक शहरातील रविशंकर मार्गावर असलेल्या कुर्डूकर नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं आहे. अशोका रॉयल बिल्डिंगच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला आहे. बिबट्याचा मुक्त संचाराचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नागरिकांमध्ये भीती..
नागरिकांनी, रात्री घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन संबंधित प्रशासनाने केली आहे. बिबट्याला वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून जेरबंद करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. बिबट्याचा मुक्त वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहरामध्ये मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असल्याचं पाहायला मिळतंय. आता दिंडोरीमध्ये १६ वर्षीय तरूण बिबट्याचा भक्ष ठरला आहे.