नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्येच आत्महत्या केली. अस्मिता संजय पाटील (18 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून अस्मिताने महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अस्मिताचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अस्मिता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तिने आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.