जामनेर (जळगाव ) : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडे बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ (SRPF) जवान प्रकाश कापडे यांनी त्यांच्या राहत्या घरी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने त्यांच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अजुनही त्यांच्या आत्महत्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नसून या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
गेली पंधरा वर्षा पासून प्रकाश कापडे हे एसआरपीएफ (SRPF) मध्ये कार्यरत होते. ते सध्या मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी बॉडीगार्डचे काम करत होते. पण आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते.
आज बुधवारी पहाटे प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली. त्यावेळी त्यांच्या घरातील सर्व जण गाढ झोपेत होते. झालेल्या गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा प्रकाश कापडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.
प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहका-यांना मिळाली. सध्या पंचनामा सुरू असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. तपास सुरू असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल असे यावेळी पोलीस म्हणाले.