नाशिक : राज्यामध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. बदलापूर प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. आता नाशिक अशाच एका घटनेने हादरले आहे. नाशिकमध्ये एका खाजगी क्लासमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रार दिली होती. अंबड पोलिसांनी संबंधित शिक्षकास अटक केल्याची माहिती समोर येत आहे. सिडको परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिडको परिसरात १० वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग झाला आहे. खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच विनयभंग केल्याची माहिती उघड झाली आहे. उपेंद्रनगरमधील एका खाजगी ट्युशन सेंटरमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मुलगी क्लासरूममध्ये एकटी होती. तेव्हा संबंधित शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे.
खाजगी क्लासमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलगी क्लासवरून घरी आली होती. परंतु दुसऱ्या दिवशी ती क्लासला जाण्यास नकार देत होती. त्यामुळे पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी सविस्तर संवाद साधला. त्यानंतर पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकल्यानंतर पीडितेच्या आईला धक्काच बसला. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांकडून आरोपीला अटक..
या सगळ्या घटनेनंतर नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शिक्षकाला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं वय ३२ वर्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.