नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांसहसह लाखो भाविक शहरात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साधुग्रामचा विस्तार करून त्यासाठी तब्बल एक हजार एकर जागा आरक्षित केली जाणार आहे. सध्या मनपाकडे ९४ एकर जागा ताब्यात आहे. उर्वरित ९०६ एकर जागेपैकी ३०० एकर जागेचे भूसंपादन करून ६०० एकर जागा सिंहस्थासाठी भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. परंतु, यापूर्वी जागेचा मोबदला न मिळालेले शेतकरी तसेच जागा मालक जागा देतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाशिकच्या सिंहस्थासाठी भाविकांसह साधू-महंतांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू आहे. साधूग्राममध्ये विविध आखाड्यांच्या साधू-महंतांना सुविधा पुरवाव्या लागतात. यासाठी एक हजार एकर जागा घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. तपोवानात साधूग्रामसाठी २८०.४६ एकर व संलग्न सुविधांसाठी ९७.०५ एकर जागा आरक्षित केली जात होती. त्यापैकी ९४.०७ एकर महापालिकेच्या ताब्यात आहे. २८३ एकर क्षेत्रावर आरक्षण असून, हे क्षेत्र संपादित होणे बाकी आहे. १३ एकर क्षेत्रात जनार्दन स्वामी मठ व लक्ष्मीनारायण मंदिरांची लक्ष्मी गोशाळा आहे. १.५ एकर क्षेत्रात अभिन्यास मंजूर आहे. २६८ एकर जागा संपादित करण्याचा प्रस्ताव होता. परंतु, आता एक हजार एकर जागा साधुग्रामसाठी घेतली जाणार असल्याने ९४ एकर क्षेत्र वगळता, ३०० एकरचे भूसंपादन, तर उर्वरित ६०० एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भूसंपादनासाठी टीडीआर, बाँडचा पर्याय
साधुग्रामचे आरक्षण असलेल्या ३०० एकर जागा संपादित करण्यासाठी महापालिकेला पाच हजार कोटीची आवश्यकता आहे. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती नाही आणि शासनाकडून एवढा निधी मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे भूसंपादनाचे मॉडेल तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार ४५ टक्के टीडीआर, ४५ टक्के रोख व १० टक्के बॉण्डच्या स्वरूपात मोबदला देण्याचा पर्याय प्रशासनासमोर आहे.
सिंहस्थासाठी एक हजार एकर जागा आवश्यक आहे. त्यानुसार जागा आरक्षित केली जाईल. ३०० एकर जागेचे संपादन तर उर्वरित ६०० एकर जागा भाडेतत्वावर घेण्याचा मनपाचा प्रस्ताव असून, याबाबत शासन, तसेच शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा