अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता निलेश लंके यांनी देखील त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं निलेश लंके यांनी जाहीर केलं.
निलेश लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना निलेश लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते भावूक झाले. यावेळी ते म्हणाले, दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असं निलेश लंके म्हणाले आहेत.
रावणाचा अंत झाला तुम्ही कोण आहात?
पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, राजकारण मला कोणती प्रतिष्ठा टिकवण्यासाठी करायचे नसून मी राजकारण सर्वसामान्य जनतेसाठी करत आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांमुळे तुम्हाला का घाम फुटला. येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल सर्वसामान्य माणूस काय आहे. रावणाचा अंत झाला तुम्ही कोण आहात? असा सवाल निलेश लंके यांनी विखेंना केला आहे.
दादांनी राजकारणात मला खूप मदत केली
अजित पवार यांच्याबद्दल आपलं मतं आजही चांगलं आणि उद्याही चांगलंच राहील. अजित दादांनी राजकारणात मला खूप मदत केली. आपला देश जातीपातीवर बोलायला लागला, आपल्या देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी मी शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य ठेवले होते. या महानाट्याबाबत एका पोलिसांनी आपलं मत व्यक्त केलं तर यांनी त्या पोलिसाला निलंबित केलं, असा टोला निलेश लंके यांनी विखेंच नाव न घेता लगावला.