नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामीची हत्या केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर भाच्याने मामीची हत्या करत स्वत:वरही वार केल्याने खळबळ उडाली आहे.. सध्या भाच्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रांती बनेरिया अस हत्या करण्यात आलेल्या मामीच नाव आहे. तर अभिषेक सिंग असं हत्या केलेल्या आरोपीच नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये बुधवारी नाशिक रोड परिसरातील सामनगाव येथील एकलहरे रोडवर क्रांती बनेरिया या महिलेची तिच्या पतीता भाचा अभिषेक सिंगने एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून हत्या केली आहे. त्यानंतर भाच्याने सदरचा प्रकार उघडकीस येऊ नये आणि मामीची हत्या दुसऱ्या व्यक्तीने केल्याचा बनाव रचला. त्यासाठी भाच्याने स्वत: च्या गळ्यावर चाकूने वार केले. या घटनेत अभिषेक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अभिषेक सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही.
दरम्यान, या घटनेचा नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक सुखदेव काळे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हवालदार जय दीपक सोनार, विष्णू गोसावी, विजय टेमगर, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, दत्तात्रय वाजे, योगेश रानडे, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरुण गाडेकर, संतोष पिंगळे, महेंद्र जाधव, भाऊसाहेब नागरे, कल्पेश जाधव यांनी या घटनेची सखोल चौकशी केली.
या चौकशीनंतर संशयित आरोपी हा अभिषेक सिंग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेप्रकरणी मृत महिला क्रांती बनेरिया हिचा पती सुदाम मनेरिया यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.