नाशिक : सासरच्या जाचास कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसह सासरच्या मंडळीने जावयास मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुगंधा पवार, हरी काळू देवरे, रत्ना हरी देवरे (रा. सातपूर), संध्या मनोहर मांडवळे व मोना गणेश जेऊघाले (दोघी रा. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत प्रभाकर हरी पवार (रा. सावतानगर, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, पवार कुटुंबीय बाहेरगावी असताना संशयित सून सुगंधा, तिचे आई-वडील बहीण व बहिणीची पुणेस्थित मैत्रीण आदींनी त्यांचा मुलगा हेमंत प्रभाकर पवार (वय ४५, रा. नारायण हाइट्स, बडदेनगर) यास मानसिक व आर्थिक त्रास दिला. या त्रासास वैतागून हेमंत पवार याने गेल्या बुधवारी (दि. १४) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा आरोप प्रभाकर पवार यांनी फिर्यादीत केलाआहे. पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करीत आहेत.