नाशिक: मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमच्या भेटीसाठी आलेल्या दोघांना एटीएसने गुरुवारी (दि.१०) नाशिकमधून ताब्यात घेतले. त्यात सालेमची भारतीय मैत्रीण आणि एका विदेशी व्यक्तीचा समावेश असून, त्यांची रात्री उशिरापर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू होती.
गँगस्टर अबू सालेम सुरक्षेच्या दृष्टीने सध्या नाशिकच्या कारागृहात आहे. त्याच्या भेटीसाठी आलेल्या दोघांच्या चौकशीत नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमला तळोजा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तळोजा कारागृहातील अंडा सेलच्या भिंती कमकुवत झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने काही महिन्यांपासून त्याला सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे. अबू सालेम कुख्यात गँगस्टर असून, त्याच्यावर अनेक खटले सुरू आहेत. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी सध्या तो शिक्षा भोगत आहे.
१९ वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये सालेमला अटक करण्यात आली होती. वादग्रस्त अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासह त्याला भारतात आणण्यात आले होते. आर्थर रोड कारागृहात अबू सालेमवर हल्ला झाल्याने त्याला तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. सध्या तो नाशिक रोड कारागृहात असून, गुरुवारी त्याची एक मैत्रीण आणि विदेशी नागरिक त्याला भेटण्यासाठी कारागृहात आले असताना एटीएसने दोघांना ताब्यात घेतले आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात संबंधितांची चौकशी सुरू असून, ते कोठून व कशासाठी आले, याविषयी चौकशीअंती खुलासा होणार आहे