नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची मोठी घोषणा केली आहे. छगन भुजबळ यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. नाशिक मतदारसंघात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचा मी मनापासून आभारी असल्याचं देखील भुजबळ यांनी यावेळी सांगितले. भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित झाली आहे.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीत जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या बाबत होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार यांचा निरोप आला होता. तिथे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे होते. आम्ही 6 वाजता दिल्लीवरून आलो आणि त्या ठिकाणी अमित शाह यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. तिथे जागा वाटपाबाबत चर्चा झाली.
नाशिकसाठी अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचे नाव सांगितलं होतं. पण अमित शहा यांनीच छगन भुजबळ यांचे नाव घेतलं होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे खासदार असल्याचे सांगितलं. परंतु अमित शाह म्हणाले की, आम्ही त्यांना समजावू. त्यानंतर आम्ही मतदारसंघात जाऊन आढावा घेतला. आम्हाला वातावरण चांगलं असल्याचं लक्षात आलं. अल्पसंख्याक ओबीसी आमच्या बाजूने असल्याचं लक्षात आले. त्यानंतर बातमी फुटली आणि माझ्या उमेदवारीबाबत माध्यमातून बातमी बाहेर आली, असं छगन भुजबळ म्हणाले.
दिल्लीतील बैठकीबाबत मी शहानिशा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे चर्चेनुसार जागा जाहीर व्हायला हवी होती. आता ३ आठवडे पूर्ण झालेत. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला आहे. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदार संघात कोण लढवणार?, कोण उमेदवार आहे? हे ताबडतोब जाहीर करावे. नाहीतर अडचण निर्माण होईल. कारण समोरचा पक्ष जोरदार कमाला लागला आहे, असंही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.