नाशिक : एक व्यक्ती त्याच्या पत्नीचेच अश्लील फोटो काढून या फोटोच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करायचा. इतकेच नाहीतर हा नराधम पती या महिलेचा मानसिक आणि शारिरीक छळही करायचा. यामध्ये सासरच्या मंडळींचीही साथ होती. पैसे आणि दागिन्यांच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडूनही छळ केला जायचा. या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली.
संबंधित महिला ही नोकरी करते. 2022 मध्ये त्यांचा विवाह झाला. काही काळ रामवाडी भागात राहिल्यानंतर ती पतीसमवेत मुंबईतील बोरीवली भागात वास्तव्यास होती. दोघे पती-पत्नी नोकरीस असल्याने सासरच्या मंडळीकडून तिच्याकडे वारंवार पैशांची आणि दागिन्यांची मागणी केली जात होती. असे असताना महिलेने त्याची पूर्तताही केली. मात्र, त्यानंतरही मागणी सुरुच राहिली.
या आरोपींना महिलेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्याचदरम्यान या महिलेच्या पतीने त्याच्या पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. याचआधारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पतीकडूनही त्रास दिला जात होता. अखेर या सततच्या छळाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान, या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी पतीसह तिच्या सासरच्या चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल असून, पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून केला जात आहे.