श्रीगोंदा : अनैतिक संबंधास विरोध केल्याने पत्नीला विष पाजून ठार मारल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. ११) शहराजवळ घडली आहे. खून करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी सुपा येथे डोंगरात पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. बापू झुंबर दातीर (रा. सप्रेवाडी, ता. श्रीगोंदा) असं आरोपीचे नाव आहे. तर संगीता बापू दातीर (वय ५०, रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंदा) असं विष पाजून ठार मारलेल्या पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पत्नी संगीता यांनी पती बापू दातीर याला बाहेरील महिलेशी संबंध ठेवू नका, असे समजावून सांगितले होते. मात्र, या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपीने तिला मारहाण करत विषारी औषध पाजले होते. गंभीर अवस्थेत असलेल्या संगीता यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम तपास करत होते. सोमवारी (दि. १२) दुपारी खबऱ्याकडून आरोपीचा शोध घेतला असता आरोपीस सुपा परिसरातील डोंगरात पाठलाग करून पकडण्यात आले. आरोपी नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.