कोल्हापूर : कोल्हापुरातील वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीनं पाण्याबाहेर काढण्यात आले आहे, तर आणखी एक मृतदेह शोधण्याचं काम बचाव पथकाकडून सुरू आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास वेदगंगा नदीवर घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नवे आहेत. तर यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी) याचा बचाव पथकाकडून शोध सुरु आहे.
आणुर (ता. कागल) गावाच्या यात्रेसाठी हे सर्व जण आपल्या पाहुण्यांच्या घरी आले होते. आज दुपारी तीनच्या सुमारास वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना या चौघांना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील सविता कांबळे आणि रेश्मा दिलीप येळमल्ले या पाण्यात बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी जितेंद्र लोकरे आणि यश येळमल्ले पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने चौघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी नदीवर दाखल होत मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले.
यावेळी दोन महिलांसह एकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे. मात्र, यश येळमल्ले याचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने गावकऱ्यांकडून शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाण्याबाहेर काढलेले मृतदेह कागल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.