नाशिक : मालेगावचे माजी आमदार रशीद शेख यांचे सोमवारी (4 डिसेंबर ) रात्री निधन झाले. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षाचे होते. दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ते मालेगावच्या एका रुग्णालयात दाखल होते. परंतु त्रास वाढल्यानंतर नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मालेगाव मतदार संघातून दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. 1999 मध्ये रशीद यांनी मालेगावमधून 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव करून धक्का दिला होता. मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा त्यांनी सांभाळली, अलीकडेच राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता.ते आधी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, पक्षसंघटना व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. याच पार्श्वभूमीवर रशीद शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
सकाळी 11 वाजता दफन विधी होणार
2017 मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. तत्पूर्वी 1994 मध्ये नगराध्यक्ष होते. यापूर्वी तीन वेळा नगरसेवक म्हणून विजयी झालेले होते. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात त्यांना महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांची कै.खलील दादा यांचे घर, गल्ली नं. एक हजार खोली येथून अंत्ययात्रा निघणार आहे. आयेशा नगर कब्रस्तान येथे आज सकाळी 11 वा दफन विधी होणार आहे. समंजस आणि समन्वयी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. राशिद शेख यांच्या निधनानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.