नाशिक : प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘झुमका वाली पोर’ या सुप्रसिद्ध अहिराणी गाण्याचा निर्माता, अभिनेता विनोद कुमावतविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी 2 फेब्रुवारीला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘विनोद कुमावत’ याने यू ट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणाऱ्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
संबंधित पाडित महिलेने नाशिक रोड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विनोदला पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देत मारहाण केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 30 ऑगस्ट 2023 ते 17 जानेवारी 2024 या जवळपास 5 महिन्यांच्या काळात विविध ठिकाणी नेत अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. युट्युबर विनोद उर्फ सचिन कुमावत हा सातपूरमधील म्हाडा कॉलनीमध्ये राहण्यास आहे. पीडित महिलेसोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले होते. दरम्यान, नाशिक रोड पोलिसांकडून आतापर्यंत विनोदवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूने तपास केला जात आहे. ‘झुमका वाली पोरं’ हे गाणं सोशल मीडियात ट्रेडिंगला असून आतापर्यंत यू ट्युबवर 225 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.