नाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (८ सप्टेंबर) कोथिंबीरच्या एका जुडीला ४०० (शेकडा ४० हजार रुपये) रुपये दर मिळाला. रविवारी झालेल्या लिलावात गावठी कोथिंबिरीला प्रतिशेकडा किमान सहा हजार पाचशे रुपये, तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये भाव मिळाला. दरम्यान, गत आठवड्यातील पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर परिसरातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला हा शेतमाल मुंबई, गुजरात, अहमदाबाद येथे पाठविला जातो, तर काही प्रमाणात स्थानिक विक्री होते. सद्यस्थितीत बाजारात पालेभाज्यांची आवक घटली आहे. यामुळे बाजारभाव वधारले आहेत.
रविवारी लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीरला प्रतिजुडी ४०० रुपये, मेथीला किमान ५० तर सर्वाधिक १३० रुपये प्रतिजुडी, शेपूला किमान २२ तर कमाल ५७ रुपये जुडी, कांदापात किमान १५ तर सर्वाधिक ४२ रुपये जुडीला भाव मिळाला आहे.