नाशिक : नाशिकमध्ये हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकाने दोन चारचाकी आणि दुचाकीला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मद्यधुंद चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे. अधीक्षक विजय चव्हाण (वय-56) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ही घटना 23 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील गणपती स्टॉलजवळ घडली आहे. ज्यांनी नागरिकांना शिस्त लावणे अपेक्षित आहे, ते सरकारी अधिकारीच बेदरकारपणे मद्यधुंद वाहन चालवित असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद गाडी चालविणारा समाज कल्याण विभागाचा अधीक्षक आहे. 23 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधीक्षक विजय चव्हाण हे त्यांची कार दारूच्या नशेत चालवत होते. पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील गणपती स्टॉलजवळ उभा असलेल्या गाड्यांवर त्यांनी जोरदार धडक दिली.
यामध्ये तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी विजय चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाहीत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.