जळगाव : शहरातील शिरसोली रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हॉटेलचालकांसह काही तरुणांमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये हॉटेलमध्ये असलेल्या तरुणांनी चालकासह वेटरला मारहाण करीत त्यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. तर दुसऱ्या गटाकडून एका तरुणावर चॉपरने हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन्ही गटातील तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.
शहरातील शिरसोली रोडवर फौजी नावाचे हॉटेल आहे. याठिकाणी अर्जुन रोहीदास राठोड हा तरुण काही मित्रांसह जेवणासाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोवत असलेल्या तरुणांचे हॉटेलमधील वेटरसोबत वाद झाला. हा वाद वाढतच गेल्याने या तरुणांनी वेटरसह हॉटेल मालकाला मारहाण केली. यावेळी हॉटेलमध्ये आलेल्या तरुणांनी तेथे पडलेली बियरची बाटली वेटरच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हॉटेल मालक हे खासगी रुग्णालयात येत असतांना पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील पायघन हॉस्पिटल समोर पुन्हा हे दोन्ही गट समोरासमोर आले. त्याठिकाणी देखील त्यांच्यामध्ये वाद झाले. यावेळी अर्जुन राठोड याच्यावर चॉपरने वार झाले असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद झालेल्या ठिकाणी हॉटेलमधून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
गोळीबार केल्याचा आरोप
हॉटेलमध्ये झालेल्या वादात तुफान राडा होवून त्याठिकाणावरील साहित्याची नासधुस करण्यात आली. दरम्यान, याठिकाणी समोरील गटाकडून गोळीबार झाल्याचा आरोप जखमी अर्जुन राठोड याने केला होता. परंतु, या घटनेला पोलिसांकडून कुठलाही दुजोरा मिव्यालेला नाही.