अहमदनगर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचे नाव अहमदनगर दक्षिणमधील संभाव्य उमेदवार म्हणून जोर धरत आहे. तेच ते कोणत्याही क्षणी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी जोरदार हवा आहे. अशातच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना आपल्यासोबत या अशी साद घातली आहे. “लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा”, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट ऑफर देऊन टाकली आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर लंके यांची प्रशंसा करताना अमोल कोल्हे यांनी म्हटले की, ‘लोकनेते माझे जवळचे मित्र आहेत. ज्यांच्या सामाजिक कार्याचा मला नेहमी अभिमान वाटतो. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील माणसं जनतेच्या काळजावर अधिराज्य गाजवतात त्यावेळी अभिमान वाटतो. महानाट्याला उदंड प्रतिसाद देणाऱ्या नगरकरांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच लाखांच्या गर्दीचे चोख नियोजन करणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मी मानाचा मुजरा करतो, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.
यानंतर अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना शरद पवार गटात येण्याची ऑफर दिली. लोकनेत्यांना वाढदिवसाला गिफ्ट द्यायचं असतं, पण मी मागतोय, लोकनेते यांनी लवकर निर्णय घ्यावा. महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही. दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून जर संसदेत आला तर सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीत घुमेल. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिण नगर मध्ये वाजली पाहिजे. लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना ऑफर देऊन टाकली.