अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच आता अहमदनगर लोकसभेची निवडणुकीत दुसऱ्या निलेश लंकेनी उडी घेतली आहे. अहमदनगरमध्ये लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार, रायगड लोकसभेतून अनंत गीते यांच्यानंतर आता अहमदनगरमध्ये निलेश लंके या नावाचा अर्ज दाखल झाल्याने चर्चेला उधान आले आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव निलेश ज्ञानदेव लंके असे आहे. यामुळे तुतारी वाजविणारा माणूस मतदारांना शोधावा लागणार आहे. गडबडीत डमी निलेश लंके यांच्या नावासमोरील बटण देखील दाबले जाण्याची शक्यता आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते नावाचे दोन उमेदवार आहेत. तिथे २०१४ ला असाच घोळ झाला होता. सुनिल तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने ११००० मते मिळविली, तर तटकरे २००० मतांनी पडले होते.
शरद पवार गटाचा सुजय विखेंवर गंभीर आरोप
याबाबत महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मविआ उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरला आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखेंनीच हा डमी उमेदवार दिल्याचा आरोप मविआकडून करण्यात येत आहे. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा आहे, अशी टीका देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे.