नाशिक: रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अद्वय हिरे यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर मालेगाव न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.
नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी युक्तिवात करताना सांगितले की, अद्वय हिरे यांनी घेतलेले 7 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज हे आज रोजी 32 कोटीपर्यंत पोहोचले आहे. यातील एकही हप्ता हिरे यांनी भरलेला नाही. तसेच ते पैसे ज्या सूत गिरणीसाठी घेतलेले होते पण तिथे न वापरता त्यांनी इतरत्र वापरले. त्यामुळेच त्यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अद्वय हिरे यांना जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा चांगलाच हिरमोड झाला. तसेच त्यांचा जामीन नाकारल्याने ठाकरे गटाचा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.