कोपरगाव : शिर्डीतील सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणात अटक असलेला आरोपी मध्यरात्रीनंतर पोलिसाच्या दुचाकीवरून उडी मारून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश ऊर्फ गोट्या पारधे असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना कोपरगाव येथील कारागृहात रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा यांच्यासह पोलिस पारधेचा शोध घेत आहेत
याबाबत अधिक माहिती अशी कि, गोट्या पारधे कोपरगावातील दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात खुनासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोपरगावच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याची रवानगी दुय्यम कारागृहात केली होती. ढाकणे त्याला दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दुचाकीवरून नेत होते. दरम्यान, वाबळे हॉस्पिटलजवळील टी पॉईटवर दुचाकीचा वेग कमी होताच पारधे दुचाकीवरून उडी मारून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गौरवगीताची रिंगटोन अन् दलित तरुणाची हत्या
शिर्डी येथे १६ मे २०१५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवगीताची रिंगटोन मोबाईलमध्ये वाजली म्हणून सागर शेजवळ या दलित तरुणाचा खून करण्यात आला होती. याप्रकरणी ९ आरोपींपैकी योगेश सर्जेराव ऊर्फ गोट्या पारधे (रा. कोल्हार, ता. राहाता, जि. नगर) हा एक आरोपी आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात खुनासह विविध गुन्हे दाखल असलेला पारधे याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.