चोपडा : शहरातील ॲक्सिस बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये ३ जून रोजी शहरातील मिलाप स्टोअर्स या कापड दुकानातील कर्मचाऱ्याने दुकानाचा भरणा केला. यात ५०० रुपये दराच्या ११ हजार रुपये किंमतीच्या २२ नोटा नकली निघाल्याचे निष्पन्न झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. याबाबत हर्षल जयविलास जैन यांच्या फिर्यादीवरून जाहीद मुस्ताक खान याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा येथील ॲक्सिस बँकेत मिलाप स्टोअरचा चार लाखांचा ३ रोजी भरणा करण्यात आला होता. या फर्मचे कर्मचारी जाहीद मुस्ताक खान (वय १८, रा. दर्गाअली, चोपडा) हा भरणा करण्यास गेला होता. त्याने ५०० रुपये दराच्या एकुण ८०० नोटा असे एकुण ४ लाख रुपये मिलाप स्टोअर्स या नावाच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात जमा करण्याकरता कॅशियरकडे रोख भरणा दिला. त्यातील ११ हजार रुपयांच्या ५०० रुपये दराच्या २२ चलनी नोटा नकली निघाल्या.
ही बाब कॅशियर हर्षल जैन यांना कळाल्याने यातील पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीस त्यांनी ही बाब सांगितली. त्याने मिलाप स्टोअचे संचालक नितीन मिलापचंद जैन यांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर बनावट नोटांच्या जागेवर ११ हजार रुपये आणून दिल्यानंतर एकुण ४ लाख रुपये खात्यात जमा करण्यात आले. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बनावट २२ नोटा बँक खात्यात जमा करुन चलनात आणल्या म्हणून त्याच्याविरुध्द भारतीय दंड संहीता कलम ४८९ (ब), ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि प्रशांत कंडारे करत आहेत.