पुणे : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महिलांची सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. दर महिन्याला 1500 रुपये राज्य शासन देणार आहे. या योजनेसाठी 1 कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
दरम्यान आता या योजनेसंदर्भात आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. राज्यभरातील महिलांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून सरकारने आता या योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, ‘ ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, ताई कुणालाही किती विरोधात बोलू देत, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावानं घेतला आहे.
तसेच, मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. अर्ज भरण्याची मुदत आता 31 ऑगस्ट. अंतिम मुदतीत नोंदणी करणाऱ्यांना देखील मिळणार जुलैपासून लाभ मिळणार. योजनेचा लाभ घेण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे.
लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करुन महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र /जन्म, प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो लागणार आहे.
राज्य सरकारकडून आता लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीत नाव असलेल्या महिलांनाच राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे आता सर्व महिलांचे डोळे लाडकी बहीण योजनेच्या यादीकडे लागले आहे.