बापू मुळीक
सासवड : पुरंदर विमानतळासाठीच्या सात गावांमधील भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी करावी लागणार असून यासाठी सुमारे 4 कोटी 86 लाख रुपयांचे शुल्क महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला भरावे लागणार आहे. या सर्व गावातील 3हजार 265 सर्वे क्रमांक मधील 2673.982 हेक्टर शेत जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, आणि पारगाव मेमाने या सात गावांमध्ये एकूण 3 हजार 265 सर्वे क्रमांक आहेत.त्यात 2 हजार 673 हेक्टर 982 आर इतकी जमीन आहे या जमिनीच्या मोजणीला लवकर सुरुवात होणार असून यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एमआयडीसीला पैसे भरण्याची सूचना केलेली आहे.
दरम्यान जागेच्या मोजणीसाठी किती शुल्क भरावे लागेल ,याबाबत एमआयडीसी ने भूमी अभिलेख विभागालाच विचारणा केलेली होती. पुरंदर विमानतळाच्या जमिनीच्या मोजणी संदर्भात अद्याप सूचना नाहीत, मोजणीचा प्रस्ताव आल्यास भूमी अभिलेख विभाग मोजणी करून देईल. विशेष पथकामार्फत ही मोजणी करावी लागेल. त्यासाठी दहा दिवसापेक्षा जास्त कालावधी लागेल. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमि अभिलेख संचालक. शुल्क भरण्याची सूचना भूमी अभिलेखाच्या पुरंदर उपअधीक्षक कार्यालयाकडून एमआयडीसीला पत्र पाठविण्यात आले आहे. त्याद्वारे जमिनीचे संपादन करण्यापूर्वी मोजणी करण्यासाठी शुल्क भरण्याची सूचना केली आहे.
एमआयडीसी कडून जलद गतीने मोजणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार या पत्रात मोजणीचे शुल्क ही जलद गतीचेच आकारण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.