नांदेड : नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. एका मतदान केंद्रावर संतप्त तरुणाने कुऱ्हाडीचा घाव घालून ईव्हीएम मशिनचे दोन तुकडे करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर, मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका शाळेच्या मतदान केंद्रावर घडला आहे. या घनटेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
भानुदास एडके असं ईव्हीएम मशिन तोडलेल्या व्यक्तीच नाव आहे. एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात कुऱ्हाड लपवून आणली. त्या ठिकाणी असलेल्या VVPAT मशीन आणि बलेट मशीन यावर कुऱ्हाडीने घाव टाकून दोन तुकडे केले. एवढंच नाही तर केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केला.
संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर गृह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते. मात्र, त्यांचाही नाईलाज झाला. दरम्यान, या प्रकाराने मतदां केंद्रावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे ५०० मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
भय्यासाहेब एडके या तरुणाने मशीन का फोडल्या? या मागे कोणाचा हात आहे? तो कुठल्या पक्षाशी संबंधित आहे का? तो राहतो कुठे? काय करतो? याची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली आहे.