हिंगोली : हिंगोली-परभणी राज्य महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव ट्रॅक्टरने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतामध्ये पती-पत्नी आणि बारा वर्षीय मुलाचा समावेश आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी (ता. १०) दुपारच्या सुमारास परभणी ते वसमत मार्गावर असोला पाटीजवळ घडली आहे.
एकनाथ बाबाराव घुगे (वय३५) त्यांची पत्नी शुभांगी एकनाथ घुगे (वय ३०) व त्यांचा मुलगा समर्थ एकनाथ घुगे (वय १२, सर्व रा. अंजनवाडी ता. औंढा नागनाथ) अशी अपघातात मृत्यू झालेल्याची नवे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी एकनाथ घुगे आणि त्यांची पत्नी शुभांगी घुगे हे दोघे दुचाकीवरून त्यांचा मुलगा समर्थ आजारी असल्याने त्याची प्रकृती दाखविण्यासाठी परभणी येथे गेले होते. त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात समर्थ याची प्रकृती दाखविल्यानंतर ते तिघेही गावाकडे परतत होते.
दरम्यान, परभणी ते वसमत मार्गावर असोला पाटी शिवारात आले असता भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने अंजनवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मयत एकनाथ घुगे हे रिसोड आगारात वाहक पदावर कार्यरत होते.