धाराशिव : शिवसेनेचा असाच एक-एक मतदारसंघ जर कमी होत राहिला, तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा तानाजी सावंत यांनीअजित पवार यांच्या समोरच दिला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेला आहे. यासंदर्भाने बोलताना तानाजी सावंत यांनी खंत व्यक्त केली आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्चना पाटील यांनी आज १९ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर महायुतीची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी तानाजी सावंत बोलत होते.
काय म्हणाले तानाजी सावंत?
आज येथे अजित पवार आहेत. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. थोडं परखड बोलतो. धाराशिवमध्ये महायुतीचा प्रचार हा जानेवारीमध्येच सुरु झाला आहे. २६ जानेवारीपासून धनंजय सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. खरे तर हा मतदार पारंपारिक पद्धतीने शिवसेनेचा आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी धाराशिव मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला, असं तानाजी सावंत यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, ज्या-ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ, तेव्हा तेव्हा समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पण हा नंतरचा भाग आहे. त्याआधी जर असाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला, तर हा शिवसैनिक आणि मी स्वत: हे सहन करणार नाही. हे आज या ठिकाणी सांगतो.
याचे कारण हा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा आहे. आठ वेळा शिवसेनेचा खासदार येथून निवडून गेला आहे. त्यामुळे हा माझ्या तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हे दु:ख विसरुन शिवसैनिकांना विनंती आहे की, अर्चना पाटील यांना आपल्याला लीड द्यायचे आहे, असं आवाहन तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना केलं आहे.