नांदेड : नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी उघड होत आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिक आजारी पडत आहेत. अशातच आता नांदेड शहरापासून जवळच असलेल्या नेरली गावातही शुक्रवारी (ता. २७) असाच एक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून दूषित पाणीपुरवठा झाल्याने अख्खं गाव आजारी पडलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मळमळ, उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरु झाल्याने गावातील 300 हून अधिक नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. हा प्रकार समोर येताच आरोग्य प्रशासन सतर्क झालं असून सध्या नेरली गावात आरोग्य पथक शड्डू रोवून आहे.
दुसरीकडे मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नांदेड शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर नेरली गाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता गावातील काही नागरिकांना अचानक मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. बघता-बघता आजारी पडणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढू लागली.
या सर्व प्रकाराची माहिती मिळताच आमदार बालाजी कल्याण आणि इतर राजकीय नेत्यांनी देखील नेरली गावात धाव घेतली. त्यांनी गावकऱ्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयात दाखल केले. आतापर्यंत 300 हून अधिक नागरिक दूषित पाणी प्यायल्याने बाधित झाल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्ण संख्या वाढत आहे. आज शनिवारी दिवसभर गावात मेडिकल कॅम्प लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गावात दूषित पाणीपुरवठा नेमका कशामुळे झाला आहे आणि याला जबाबदार कोण? याची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.