नांदेड: नांदेड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘आमच्या मुलीशी तू का बोलतोस’ असे म्हणत नातेवाईकांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. गावात बेज्जत करण्याच्या भीतीने एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड शहराजवळच्या सुगाव या ठिकाणी गुरुवारी सकळी साडे आठच्या सुमारास घडली आहे. नितीन प्रभू शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीसह 7 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं
अधिक माहिती अशी की, नितीन शिंदे या तरुणाचे सुगाव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. या दोघांमध्ये तीन ते चार वर्षांपूर्वी दहावीत शिकत असताना मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मागे एका वर्षापूर्वी मुलीच्या घरी या दोघांच्या प्रेमप्रकरणा विषयी कळले. त्यानंतर घरच्यांनी मुलाला चांगली समजही दिली होती.
आम्ही देशमुख आहोत अन् तुम्ही पाटील…
दरम्यान, मागच्या सहा महिन्या अगोदर मुलीच्या चुलत भावाने ‘मुलीशी फोनवर का बोलतो’ असे म्हणत नितीनला मारहाण केली होती. त्यानंतर 18 मार्च ला नितीन कामाहून घरी येत असताना मुलीच्या घरच्यांनी त्याला पुन्हा मारहाण केली. तेंव्हा आम्ही देशमुख आहोत अन् तुम्ही पाटील, तुमची औकात सुद्धा नाही, तुम्हाला रस्त्यावर आणून बेज्जत करतो, कापून टाकतो अशी धमकी दिली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
त्यानंतर भीतीपोटी शिंदे या तरुणाने गुरुवारी राहत्या घरीच सिलिंगला दोरी बांधून गळफास घेतला. त्यानंतर नितीनचे वडील प्रभू शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली. शिंदेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरुन मुलीसह संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, ज्ञानदेव भोसले यांच्यावर लिंबगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करत आहेत.