परभणी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा शासनातर्फे करण्यात आल्याने राज्यातील महिला वर्ग खुश आहे. या योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी त्यांची सध्या लगबग सुरू आहे. त्याचवेळी परभणीतील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेल्या अजबगजब मागणीने प्रशासनालाही गोंधळात टाकले आहे. एक तर राज्यात संपूर्ण दारूबंदी करावी, अन्यथा ज्या महिलांचे पती दारू पितात त्यांना मागतील तेवढी रक्कम दारूसाठी देऊन उर्वरीत पैसे दिवाळी भाऊबीज म्हणून पत्नीच्या म्हणजे माताभगिनींच्या खात्यावर जमा जमा करावी, अशी मागणी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केली आहे.
त्यांच्या या मागणीवर शासनाने ‘सकारात्मक’ निर्णय घेतला तर मात्र, राज्यातील दारूड्या पतीदेवांची मात्र मजा होणार आहे. सदर निवेदनावर शिवसेनेच्या महिला आघाडी शिंदे गटाच्या पदाधिकारी रेखा खरात, सोनाबाई लांडगे, समाबाई आगढे, नागुबाई हतागळे, सरस्वती राऊत, विमल उबळे, विजयमाला, शीलाबाई आदींची नावे आहेत.
निवेदनात मांडले दारूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा मुद्दा
आज राज्यात अनेक महिलांचा पैसा पती दारूत उडवतात. त्यामुळे महिलांना मुलांचे शिक्षण, वडीलधाऱ्यांचा दवाखाना व इतर गरजाही पूर्ण करता येत नाहीत. पतीच्या व्यसनीपणामुळे माताभगिनींना त्यांचे मंगळसूत्र, जोडवे मोडून मुलांचे शिक्षण करावे लागते. या गोष्टीला आळा घालण्यासाठी एक दिवाळीची भाऊबीज म्हणून दारूड्या पतींच्या बायकांचे बँक खाते व आधार कार्ड जमा करून सदर पतीने ज्या काही रकमेची दारू मागितली, त्या रकमेपैकी अर्धी रक्कम लगेच त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बँक खात्यावर वर्ग करावी. उर्वरीत रक्कम पतीस दारू पिण्यासाठी द्यावी असे आदेश पारीत करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात करण्यात आली आहे.