कन्नड तालुका : तालुक्यातील करंजखेडा येथील महादेव खोरा शिवारातील शेतात राजकीय वादातून धारदार शस्त्राने सरपंच महिलेच्या पुत्राची हत्या केल्याची घटना गुरुवार एक ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली. हत्या झालेल्या तरूणाचे नाव निलेश कैलास सोनवणे (वय ३२ रा. करंजखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे.
करंजखेडा येथील सरपंच संगीता कैलास सोनवणे (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरूवार एक ऑगस्ट रोजी सकाळी आरोपी भगवान कोल्हे, मयूर साळुंखे, विजय वाघ, धनराज कोल्हे, भूषण कारले, रुपेश मोकासे (रा. सर्व करंजखेडा ता. कन्नड) यांनी राजकीय वादातून त्यांचा मुलगा निलेश कैलास सोनवणे (वय ३२ रा. करंजखेडा) यास करंजखेड महादेव खोरा शिवारातील शेतात धारधार शस्त्राने मानेवर आणि पाठीवर वार करून खून केला असल्याचे म्हटले आहे. झालेल्या या घटनेमुळे करंजखेड परिसरात एकच खळबळ उडाली. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मयत निलेश व आरोपी यांच्या स्थानिक गावाच्या राजकारणातून छोटेमोठे वाद होऊन खटके उडायचे. याच राजकीय वैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सदर आरोपींविरुद्ध कलम १०३ (१) १८९(२) १९१ (८) १९० भारतीय संहिता अट्रासिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चारजण पसार झाले आहेत.