छत्रपती संभाजीनगर: येथील आंतरराष्ट्रीय चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी येथील सुविधा तसेच सेवांची पाहणी एअर एशिया एअर लाइन्स टीमच्या वतीने करण्यात आली. टीमने विमानतळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. पश्चिम आणि दक्षिण भारताचे एअर एशिया रिजनल सेल्स हेड किशोर नुनावथ यांनी इमिग्रेशन आणि कस्टम विभाग, सुरक्षा होल्ड क्षेत्र आणि बॅगेज क्लेम क्षेत्र तसेच छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय निर्गमन आणि आंतरराष्ट्रीय आगमन विभागांना भेट दिली.
विमानतळ संचालक शरद येवले यांच्याकडून माहिती जाणून घेऊन एअर एशिया टीमने छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण क्षमता मोजण्यासाठी स्थानिक ट्रॅव्हल्स एजंट आणि उद्योग संघटनांची भेट घेतली. येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी सुरुवातीला थायलंडची राजधानी बँकॉक आणि मलेशियाची राजधानी क्वालालंपूरशी जोडली जाणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष या टीमने काढला. एअर एशिया जून-सप्टेंबरपासून छत्रपती संभाजीनगर ते बँकॉक अशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे. सर्व नियामक मान्यता मिळाल्यावर ही एअर लाइन आंतरराष्ट्रीय उड्डाण त्यांच्या आरक्षण प्रणालीवर अपलोड करू शकते.