मुंबई: राष्ट्रवादी पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य सतीश चव्हाण यांचे पत्र अत्यंत गंभीर असून पक्षाचा शिस्तभंग करणारे आहे. पक्षात कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी चव्हाण यांच्याविरोधातील कारवाईचे संकेत दिले.
महायुती सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, अशी खंत चव्हाण यांनी आचारसंहिता जाहीर होताच पत्राद्वारे व्यक्त करून राज्य सरकारवर टीका केली. त्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, चव्हाण यांच्याविरोधात कारवाई करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तसेच चव्हाण यांच्याशीही चर्चा करू, त्यांनी कोणत्या मानसिकतेतून हे वक्तव्य केले आहे, हे जाणून घेऊ. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तातडीने कारवाई केली जाईल.
निवडणूक आयोगाने मंगळवारपासून आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून राष्ट्रवादीत बाहेरील नेत्यांच्या प्रवेशाची मालिका सुरू होणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. आम्ही २८८ मतदारसंघांमध्ये पक्षाचे निरीक्षक नेमणार आहोत. ते निरीक्षक पूर्ण वेळ त्या मतदारसंघात थांबतील. प्रमुख पदाधिकाऱ्यांवर मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार आहे. महायुतीमार्फत जी यादी जाहीर झाली, त्यात तिन्ही पक्षांचे समन्वयक होते. परंतु, आम्ही पक्षाचे स्वतंत्र निरीक्षक नेमणार आहोत. निवडणूक प्रचारात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेतली जाणार असल्याचेही तटकरे म्हणाले.
चव्हाण तुतारीकडून लढण्यास इच्छुक
चव्हाण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता असल्याने चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते.