छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर चाकूने वार केले होते. ही घटना इंदिरानगर येथील गारखेडा परिसरात १४ जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत अमित मुरलीधर साळुंके (वय-२५) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी गीताराम भास्करराव कीर्तिशाही, अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही (दोघे रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अमित हा खासगी कंपनीत काम करत होता. दरम्यान, अमितची लहानपणीची मैत्रिण विद्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र, भिन्न धर्मामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारल्याने २ मे रोजी ते घरी परत आले. त्यानंतर त्यांचा आनंदात संसार सुरू होता.
मात्र, विद्याच्या कुटुंबाच्या मनातला राग गेला नव्हता. विद्याचे वडील गीताराम कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलै रोजी अमित परिसरात फिरत असताना गीताराम व आप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने वार केले. त्याच्या पोटावर, छातीवर आणि मांडीवर वर केले. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.