बीड : काही दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यामध्ये ते नायब तहसीलदारांना धमकी देत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेतील लेखापालास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. गणेश पगारे असे धमकी दिलेल्या लेखापालाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार क्षीरसागर यांनी धमकी दिल्याची तक्रार करणारे गणेश तुळशीराम पगारे हे बीड नगरपरिषदेत लेखापाल या पदावर कार्यरत आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिली आहे. त्यात पगारे कुटुंब भयभीत झाले असून, पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलहून पगारे यांना धमकी देणारा फोन कॉल आला होता. त्यानंतर आमदार क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पगारे यांच्याकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता आमदार संदीप क्षीरसागर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. या घटनेने बीडच्या जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.