मुंबई : माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घराची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच, सोळंके यांच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवल्या होत्या. याबाबत प्रकाश सोळंके यांनी त्या दिवशी नेमकं काय काय घडलं हे मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर सांगितलं.
“या जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे अनेक लोक देखील सहभागी होते. जे माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक आहेत. याबरोबर त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होते ते पूर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठ्या दगडांसोबत पेट्रोल बॉम्ब देखील होते. हे सर्वजण संपूर्ण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते”, असा खळबळजनक दावा आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.
आमदार प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणाले?
राज्यात 2 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय सूरू आहे. ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. त्यातच बीड जिल्ह्यात वातावरण गंभीर आहे. 2011 पासून मनोज जरांगे पाटील हे आरक्षण या विषयावर काम करत आहेत. संपूर्ण मराठा समाज हा त्यांच्या नेतृत्वात एकवटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं यासाठी समाजातील सर्वजण प्रयत्नशील आहेत. मी या आंदोलनात मागील 2 महिन्यांपासून सहभागी आहे. मी बीडमधील माजलगाव मतदारसंघाचा आमदार आहे. आमदार होण्यापूर्वी पंचायत समिती सभापती जिल्हापरिषद सदस्य देखील होतो. तसेच माझे वडिल जिल्हा परीषद अध्यक्ष होतें. 1967 ते 80 ते राज्यमंत्री, मंत्री देखील होते. मी स्वतः राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. 1987 ते 2023 माझा 36 वर्षाचा अनुभव आहे. माजलगाव मतदारसंघात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
30 ऑक्टोबरला मी घरातच होतो. त्यादिवशी माजलगाव बंद करण्यात आले होते. त्यावेळी 5 हजार तरुण जमा झाले होते. सकाळी साडे दहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणारं आहे, अशी माहिती दिली. मी तरीही तिथेच थांबलो. मी त्यांच्याशी बोलता यावे म्हणून थांबलो. या जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे अनेक लोक देखील सहभागी होते. जे माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक आहेत. याबरोबर त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होते ते पूर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठ्या दगडांसोबत पेट्रोल बॉम्ब देखील होते. हे सर्वजण संपूर्ण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते.
सोळंके पुढे म्हणाले की, 300 लोकं हे अवैध धंदा करणारे, काळाबाजार करणारे आणि माझे विरोधक होते. मी पोलिसांना सर्व सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. मी जिल्हा पोलिसांकडे मागणी केली आहे की केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई नको. हल्ला करणारे हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे माहिती नाही. आत्ता पर्यंत एकूण 21 लोकांना अटक झाली आहे. त्याला सीसीटीव्ही फुटेजचा आधार आहेच. यामध्ये 8 आरोपी मराठा आंदोलकांनाव्यतिरिक्त आहेत. माझ्या ऑफिस आणि घराचं संपूर्णपणे नुकसान झाले असून मी याबाबत अजुनही तक्रार दिली नाही, असं देखील सोळंके म्हणाले.