बीड: माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांना भर चौकात खेचत अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या मारहाण प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना भर चौकात खेचून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माजलगावमधील रंगोली कॉर्नर येथे महादू सोळंके यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात अशोक बाळासाहेब सोळंके, मेघराज अर्जुन सोळंके, अजय सिंह राऊत, अभय राऊत यांच्यासह इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती माजलगाव पोलिसांनी दिली आहे.
नेमकी मारहाण कशामुळे?
काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनादरम्यान माजलगावमध्ये जाळपोळ झाली होती. या प्रकरणामध्ये आमची नावं विनाकारण का टाकली? असा जाब विचारत आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना मारहाण केली. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का घेतले? माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतो का? मी कुठे तरी या जाळपोळीत होतो तरी का?’ असे म्हणत सलूनमध्ये दाढी करत असलेल्या महादू सोळंकेंना बाहेर ओढत आणून मारहाण केली. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीचे मोबाईलवर चित्रिकरण देखील करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.