धाराशिव : आरक्षणाच्या मागणीवरून संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच शनिवारी राज्याचे आराेग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी तुळजापुरात माेठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दाेन दिवसांत सुटेल, अशी आशा असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
तुळजापूरमधील महाआराेग्य शिबिरास भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बाेलत हाेते. मंत्री सावंत म्हणाले, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि केंद्रातील नेतेमंडळी प्रयत्न करीत आहेत. निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून युध्द पातळीवर पुरावे गाेळा करण्यात येत आहेत. ही समिती प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रशासन तसेच नागरिकांकडून पुरावे स्वीकारत आहे. हा प्रश्न लवकरात लवकर साेडविण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे येत्या दाेन दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.