जालना: मराठा आरक्षणासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण करावं, इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. या उपोषणादरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, अशा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे रविवारपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली आहे. त्यानंतर आता त्यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. यापुढे अन्न, पाणी तसेच उपचारही घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता या आंदोलनाचे लोन महाराष्ट्रभर पसरताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभर आरक्षणासाठी आंदोलन सुरू करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गावागावात आता पुढाऱ्यांना बंदी करा. ते इकडे येऊन काय करणार आहेत. त्या आमदारांनी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणावर आवाज उठवावा. आमची मुलं मरत असताना तुम्ही मजा बघू नका, जरा गांभीर्याने घ्या, अन्यथा झेपणार नाही असं देखील ते म्हणाले.