जालना: मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी प्रवर्गातून हे आरक्षण मिळू शकते. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या सातत्यानं होतं आहेत. या आत्महत्या राज्य सरकार अजुनही रोखू शकलेलं नाही. तसेच आरक्षण सरकार कसे देऊ शकते, हे आम्ही आता समोर आणणार आहोत, असे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले. मराठा समाजाला सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, आता संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराच मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सुनिल नागणे आणि प्रतापसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.
पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाने सांगितले की, सरकारने आयोगाची पुनर्रचना करून मागासलेपण सिद्ध करायला सांगायला हवे. आता केवळ कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी केली जाईल. आम्हाला हिंदू मराठा म्हणुन आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे. सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे, असं सांगितलं जातं, पण किती दिवस हा प्रकार सुरू राहणार आहे? अशी विचारणा देखील मराठा क्रांती मोर्चाने केली. सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह पीटीशन दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर तत्काळ टास्क फोर्स सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.
मनोज जरांगे यांचे दीड महिन्यापासून आंदोलन
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, म्हणून मागणी केली जात आहे. मनोज जरांगे हे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. आता त्यांच्या माध्यमातून घराघरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जात आहे. जरांगे यांच्या बाजूला बसलेले किशोर चव्हाण हे आमचे बांधव आहेत. त्यांनी आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी याचिका कोर्टात दाखल केली होती. परंतु कोर्टाने ती फेटाळली. त्यामुळं आमची एकच मागणी आहे, 50 टक्क्याच्या आत ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या, अशी भूमिका या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.